अण्णांच्या सोशल नेटवर्किंगमधील इनिंगचा शेवट…

अण्णा हजारे यांनी आपला ब्लॉग बंद करण्याचा निर्णय जाहीर केलाय. वर्डप्रेस आणि ब्लॉगस्पॉट या ब्लॉगसाईटवर असलेला अण्णा हजारे सेज हा ब्लॉग बंद करण्याचा निर्णय अण्णांनी आज राजधानी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला. तसंच या ब्लॉगवर त्यांचे माजी अधिकृत ब्लॉगर राजू परूळेकर यांनी टाकलेलं पत्र आपली सही नसल्यामुळे अधिकृत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

अण्णांनी आपलं 14 दिवसाचं मौन सोडल्यापासून ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी निमित्त ठरलंय, त्यांच्या ब्लॉगचं… आपल्या अधिकृत ब्लॉगरने जाहीर केलेल्या मतभेदामुळेच अण्णा अडचणीत आलेत. त्यामुळे अण्णांना आपला ब्लॉगच बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

अण्णा हजारे यांनी 29 सप्टेंबरपासून ब्लॉग लेखनाला सुरूवात केली होती. क्रांती मोठ्या पल्ल्याची लढाई हा त्यांचा पहिला ब्लॉग. हा ब्लॉग मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांमध्ये पब्लिश करण्यात आला. त्यांच्या या ब्लॉगला मोठा प्रतिसादही मिळाला होता. तब्बल दोन हजारपेक्षाही जास्त नेटीझन्स त्यांचा वर्डप्रेसवरील ब्लॉग फॉलो करतात. फक्त ब्लॉगच नाही तर ट्वीटर, फेसबुक, गूगल प्लस यासारख्या सोशल नेटवर्किंगमध्येही अण्णांनी आपली खाती सुरू केली होती.

अण्णांनी आपले ब्लॉग लिहिण्याची जबाबदारी अधिकृतपणे विजय कुवळेकर आणि राजू परूळेकर यांच्यावर सोपवली होती. तसं पत्रही त्यांनी आपल्या ब्लॉगवरच प्रकाशित केलं होतं. अण्णांना जे काही लिहायचं आहे, ते कागदावर लिहून देत, त्यानंतर ते ब्लॉगवर पब्लिश केलं जात असे. मौन सुरू असतानाच्या काळात अण्णांच्या वेगवेगळ्या ब्लॉगमुळे त्यांची भूमिका स्पष्ट होण्यात आणि ती जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये पोहोचण्यास या ब्लॉगचा मोठा उपयोग झाला होता.

आज नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत अण्णांनी स्पष्ट केलं की, टीम अण्णांची कोअर कमिटीमध्ये काही फेरबदल करण्याचा माझा विचार होता, त्यासंदर्भातली काही मते मी माझ्या दररोजच्या टीपणांच्या वहीत नोंदवली होती, पण तो काही माझा निर्णय नव्हता. त्यामुळे जो माझा निर्णय नाही, ते ब्लॉगवर येऊ शकत नाही. माझ्या ब्लॉगचा गैरवापर झाला आहे, त्यामुळेच मी ब्लॉग बंद करण्याचा निर्णय घेत आहे.

शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेतही अण्णांनी कोअर टीमची फेररचना करण्याचा कसलाही विचार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यावर पत्रकारांनी त्यांना अण्णांच्या अधिकृत ब्लॉगची माहिती दिल्यावर त्यांनी स्पष्ट केलं होतं, की मी माझ्या ब्लॉगरला पैसे देत नाही की मी त्याची निुयुक्ती केलेली नाही. अण्णांनी राजू परूळेकर यांच्यापासून पूर्ण फारकत घेण्याचा निर्णय खरं तर कालच जाहीर केला. आज फक्त त्यांनी ब्लॉग बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.

अण्णांची सोशल नेटवर्किंगमधली कारकिर्द ही तशी अल्पायुषीच ठरली. म्हणजे फक्त सप्टेंबरचे दोन दिवस, ऑक्टोबरचे 31 दिवस आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे आज पाच नोव्हेंबरला पब्लिश झालेला ट्रूथ मस्ट प्रिवेल हा शेवटचा ब्लॉग ठरला. फक्त 38 दिवसाचं अण्णाचं ब्लॉगिंग एका वादाने संपलं.

माझे फेसबुक मित्र सुधाकर जाधव यांनी टीम अण्णांच्या एकूण अंतर्विरोधाचा सुरेख आणि मुद्देसूद आढावा आपल्या ब्लॉगमधून घेतलाच आहे. मला त्याविषयी काहीच लिहायचं नाहीय. फक्त अण्णांचं सोशल नेटवर्किंग किंवा ब्लॉगिंग सुरू होतं, आणि त्यातले विषय यापुरताच माझा मुद्दा मर्यादित आहे. (आत्ताच आलेल्या बातमीमध्ये अण्णांनी राजू परूळेकर यांना ‘घरचा भेदी’ म्हटलंय… मला त्यावरही चर्चा करायची नाहीय)

अण्णांनी (म्हणजेच कालपर्यंत त्यांचे अधिकृत ब्लॉगर असलेल्या राजू परूळेकर यांनी) मी आणि माझा ब्लॉग असा विषय घेऊन 3 नोव्हेंबरचा ब्लॉग पब्लिश केला होता. इंडियन एक्स्प्रेसने त्यांना ब्लॉगिंगविषयी विचारल्यानंतर त्यांनी हा ब्लॉग लिहिला होता. त्यामध्ये ते लिहितात,

“आज माहिती-तंत्रज्ञानाने जगामध्ये आश्चर्यकारक प्रगति केली आहे. सर्व जगभर माहिती-तंत्रज्ञानाच्या स्पर्धा सुरु झालेल्या आहेत. दररोज आश्चर्य वाटावे अशी प्रगती होत आहे. त्यामध्ये भारतही मागे नाही हीं अभिमानाची गोष्ट आहे. मी गांधीजींच्या विचारसरणीचा पुरस्कर्ता असलो तरीही आजचे माहिती आणि तंत्रज्ञान महात्मा गांधीजींच्या वेळेला असते तर त्यांनीही या तंत्रज्ञानाचा नक्कीच उपयोग करून घेतला असता, असं मला वाटते. कारण या तंत्रज्ञानामुळे माणसांच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा असतो. त्या वेळेची बचत होते.”

आणि आज लगेच त्यांना आपल्या ब्लॉगचा शेवट करावा लागलाय. आपल्या ब्लॉगविषयी लिहिताना त्यांनी माहिती-तंत्रज्ञान क्रांतीचा म्हणजेच तंत्रज्ञानातल्या प्रगतीचाही गौरव केलाय,

“या (माहिती) तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांवर होणारा खर्च वाचला आहे. त्याचप्रमाणे प्रदुषण न करता विकास होत आहे, ही महत्त्वाची बाब आहे. या तंत्रज्ञानामुळे जग फार जवळ आले आहे. आता माणसे जवळ कशी येतील असा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी महात्मा गांधीजींच्या विचाराला या टेक्नोलोजीची जोड दिली, तर दोन्ही गोष्टी साध्य होतील, असं मला वाटते.”

म्हणूनच की काय, आपल्या ब्लॉगमध्ये अण्णांनी आपल्या जनलोकपाल आणि भ्रष्टाचार निर्मूलन या प्रमुख
मोहीमेशिवाय अतिशय वेगळा असा ब्लॉग 10 ऑक्टोबरला लिहिला, हा ब्लॉग होता… अॅपलचे सर्वेसर्वा स्टीव जॉब्ज यांच्या निधनाबद्धल शोक आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्धल कृतज्ञता व्यक्त करणारा… त्याचं शीर्षक होतं, संवादाचं माध्यम देणारा हरवला…

एका पारदर्शक आणि लोकशाहीधिष्टीत माध्यमापासून अण्णांना फारकत घ्यावी लागलीय. आता अण्णा एवढ्यात पुन्हा ब्लॉगिंग सुरू करणार नाहीत. कारण अण्णा स्वतः काहीच ब्लॉगवर पब्लिश करत नाहीत. त्यांच्यावतीने कुणीतरी हे काम करायचं. त्यामुळे ते पुन्हा आपलं काम दुसऱ्या कुणाला तरी सांगण्याचा धोका नक्कीच घेणार नाहीत. खरं तर अण्णांना त्यांच्या पहिल्या उपोषणाच्या वेळी सर्वाधिक पाठिंबा मिळाला तोच मुळी या सोशल नेटवर्किंगवाल्यांकडून… म्हणजेच या देशातल्या तरूणांईकडून… नंतर पाच महिन्यांनी रामलीला मैदानावर झालेल्या उपोषणालाही याच तरूणाईने सोशल नेटवर्किंगवरून अण्णांच्या आंदोलनाला साथ दिली. पण तेव्हापासूनच टीम अण्णांमधल्या अंतर्विरोधाने आजचा दिवस उगवला.

आज पारंपरिक आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया अण्णांसोबत आहे, म्हणून अण्णांनी ब्लॉगिंगपासून फारकत घेणं तितकं अवघड वाटत नसावं… किंवा त्यांना ब्लॉग बंद करणं सहज शक्य झालं असावं… पण ज्या दिवशी अण्णांनी आपलं ब्लॉगिंग बंद करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासूनच टीम अण्णांचे खंदे सहकारी अरविंद केजरीवाल ट्वीटरवर दाखल झालेत. अरविंद केजरीवाल काय किंवा किरण बेदी या स्वतःच स्वतःचं ट्विटिंग करत असल्यामुळे त्यांच्यांवर अण्णांसारखी वेळ येणार नाही, भविष्यात कधीच…

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Join the Conversation

1 Comment

  1. पाटील साहेब,नुकतीच हीच कॉमेंट मी “अण्णा हजारे” ह्या विषयाला अनुसरून एका दुसऱ्या ब्लॉगवर केली होती,तथापि आपला लेख पहाता ती येथे हि यथा-योग्य ठरेल असे वाटल्याने ती कॉपी पेस्ट करीत आहे.

    मुळात दिल्लीला जाऊन मुख्य प्रवाहात आल्यावर मगच अण्णांचा जास्त उदोउदो सुरु झाला हि वास्तवता आहे.

    वाचनीय माहितीधारे राळेगणसिद्धी मध्ये अण्णांची जवळपास हुकुमशहा सदृश व्यवस्था आहे असे वाटते /दिसते. मुळात हुकुमशाही हि निरपेक्षपणे राबविता आल्यास त्याचे तोट्या पेक्षा फायदे अधिक असू शकतात ह्या बद्दल तितकासा वाद नसावा.फक्त हाच हुकुमशहा जेव्हा क्वचित प्रसंगी एककल्लीपणा कडे झुकतो ,तेव्हा काही वादविवाद उद्भवणे स्वाभाविक बनते.टीम अण्णांच्या काही माजी मान्यवरांच्या म्हणण्या नुसार अण्णांच्या स्वभाव-दोषा मुळे ती मंडळी त्यांच्या पासून दुरावली गेली.सध्याच्या राजू परुळेकर ब्लॉग प्रकरणात अण्णांचा खोटारडेपणा मात्र उघड्यावर आला हे कुणी नाकारू शकत नाही.अण्णा ज्या गांधीगिरीचा झेंडा पुढे नेऊ इच्छितात,त्या गांधींचा सदैव सत्याची कास धरणारा,वेळप्रसंगी स्वतःची चूक /चुका मान्य करण्याचा त्यांचा मनाचा मोठेपणा,आपल्या अंगी बानवण्यास अण्णा सोयीस्कर विसरले/विसरतात,हीच ह्या एकूणच आंदोलनातील वरवर दिसायला खूप छोटी पण परिणामांचे दृष्टीने फार मोठी अशी गोष्ट आहे.” एखादी गोष्ट केल्या नंतर, “नाही” म्हणून पडणे ,१८० डिग्रीत घुमजाव करणे हि घाणेरडी जरी असली तरी पण एक कला आहे.धडधडीत,उघड-उघड खोटे बोलणे हे माणूस मोठा होण्याचे/झाल्याचे लक्षण असते/आहे.तथापि ते लोक,वास्तवता लोकांना कळून देखील,कुणाला त्याचा शहानिशा करता येणार नाही,व तसा प्रयत्न कुणी केल्यासच तो पुरावा कमकुवत समाजाला जाईल ह्याची व्यवस्थित काळजी घेतात.अण्णा ह्यात खूपच कच्चे आहेत.त्यांचे वयोमान पहाता कुणी ते चव्हाट्यावर आणत नव्हते हि वास्तवता होती,पण राजू परुळेकर पडले हाडाचे,तेथे सध्या पंचाईत झाली.त्या मुळे ह्या पुढे अण्णांनी सध्याच्या काळातील गतिमान मिडिया आणि त्या अनुषंगाने येणारी साधने ,त्यांचे फायदे तोटे ह्याचा व्यवस्थित अभ्यास करून मगच पुढील पावले उचलावीत असे आग्रहाने म्हणावेसे वाटते.अण्णांचे आंदोलन हि ह्या देशाची नि काळाची गरज आहे पण ते एकटे हे आंदोलन पुढे नेऊ शकणार नाहीत हि वास्तवता आहे त्या मुळे चांगले नि लायक असे लोक त्यांच्या पासून वेगाने दूर होणे हे बरे नव्हे.अण्णांनी मौनात असताना आत्मपरीक्षण करावे असे आग्रहाचे सांगणे.

Leave a comment