नापास तर शाळा झाल्यात….!

दहावीचा निकाल लागला. निकालादिवशी मी फेसबुकवर स्टेटस अपडेट केलं.

दहावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन… पास झालेल्यांचे सर्वजण अभिनंदन करतीलच, पण नापासाचं विशेष कौतुक… कारण त्यांनी शाळेला आपल्या शिक्षणात हस्तक्षेप करू दिलेला नाहीय..

यापूर्वी बारावीची परीक्षा झाली तेव्हाही मी असंच फेसबुक स्टेटस अपडेट केलं होतं… ते असं होतं…

बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि न झालेल्याही सर्व विद्यार्थ्याचं अभिनंदन… उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांनी धाडसाने परीक्षा दिली, हे काय कमी आहे… परीक्षेतल्या यशापेक्षा परीक्षा देण्याची मानसिक तयारी जास्त महत्वाची आहे

या दोन्ही स्टेट्सला दहा बारा जणांनी लाईक केलं, काहींना स्टेट्स आवडलं, त्यांनी कॉमेन्ट केल्या… माझ्यासाठी दहावी-बारावीच्या निकालाचा दिवस हा नेहमीच अशा औत्सुक्याचा आणि तणावाचा राहत आलाय. दहावी-बारावी परीक्षा बोर्ड लाखो विद्यार्थ्यांची दरवर्षी परीक्षा घेतं… पेनाच्या एका फटकाऱ्यासरशी किंवा कॉम्प्युटरच्या एका क्लिकसरशी या लाखो विद्यार्थ्यांपैकी पास की नापास ठरवून टाकतं.. पुढे त्या विद्यार्थ्याचं काय होतं, कुणालाच त्याचं सोयरसुतक नसतं…

माझे दोन्ही मोठे भाऊ दहावी-बारावीला होते, तेव्हा वर्तमान पत्रात सर्वच्या सर्व निकाल छापून यायचा. म्हणजे उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे नंबर छापण्यासाठी हे पेपरवाले खास पुरवण्या काढायचे. मग राज्यात पहिला दुसरा कोण आला, त्यांच्यावर होणारा बक्षिसांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव याची स्वतंत्र बातमी पहिल्या पानावर असायची. एवढंच नाही तर आणखी एक हमखास न्यूज आयटम म्हणजे या गुणवंताना भविष्यात काय व्हायचंय… या प्रश्नाचा… म्हणजे कुणाला आयएएस व्हायचं असतं तर कुणाला आयपीएस, काहींना डॉक्टर होऊन रूग्णांची सेवा करायची असते तर काहींना इंजिनीयर होऊन देशाची सेवा करायची असते. कॉमर्सवाले हमखास सांगायचे, की त्यांना सीए वगैरे व्हायचं… आणि मग बोर्डात आलेल्या किंवा बोर्डाच्या गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांची यादी. कोण कोणत्या कॉलेजचा हे सर्व आम्ही वाचत बसायचो. काही बातम्या थोड्या हटके असायच्या, म्हणजे मोलकरणीच्या मुलीने किंवा झोपडपट्टीतल्या मुलीने मिळवलेलं यश वगैरे… बरं वाटायचं वाचून…

पुढे माझ्याच दहावीच्या वेळी मात्र पेपरवाल्यांनी सर्वच्या सर्व निकाल छापणं बंद केलं होतं… मला निकाल बघावा लागला तो एका स्थानिक वर्तमानपत्राच्या कार्यालयात दोन रूपये देऊन. पास झालो होतो. पुढे बारावीलाही तसंच… पेपरच्या ऑफिसमध्येच निकाल पाहिला होता. पुढे पत्रकारितेत आल्यावर मी स्वतः एकदा वार्तांकनासाठी शिवाजीनगरच्या बोर्डाच्या मुख्यालयात निकाल आणण्यासाठी गेलो होतो. तेव्हाही निकाल म्हणजे काहीतरी जगावेगळा इव्हेंट वाटायचा.. आता तसं काही वाटत नाही. पण निकाल देण्याच्या पद्धतीत अनेक बदल झालेत. आता निकाल ऑनलाईन मिळतो. पुढे साताठ दिवसांनी तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये मार्कशीट मिळते. आता एसएमएसच्या माध्यमातूनही निकाल बघण्याची सोय आहे. तंत्रज्ञान एवढं झपाटलं असलं तरी ते निकालाची भिती कमी करू शकलेलं नाही. निकालाच्या दिवशीची तगमग माझ्या लहानपणी होती, तशीच आजही आहे. म्हणजे जगातली सगळी तंत्रज्ञानं, ती डेवलप करणारे तंत्रज्ञ आणि एकूणच शाळा आणि शिक्षण नावाची सिस्टीम निकालाची भिती करण्यात अणुत्तीर्णच झालेत की… म्हणूनच मी माझ्या फेसबुक स्टेटस् मध्ये जाणीवपूर्वक नापास झालेल्या विद्यार्थ्याचं अभिनंदन केलं, कारण या विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याचं धाडस दाखवलं होतं… परीक्षेतल्या यशापेक्षा परीक्षा देण्याची मानसिक तयारीच जास्त महत्वाची हे माझं पहिल्यापासूनच प्रामाणिक मत आहे. मला दहावी-बारावीत फार चांगले मार्क्स पडले नाहीत. अगदी फर्स्ट क्लासही नव्हता. पण त्या मार्कांमुळे माझं काहीच अडलं नाही. उलट बारावीच्या परीक्षेचं टेन्शन येऊ नये म्हणून मी प्रत्येक पेपरनंतर मस्तपैकी सिनेमा पहायला जायचो. अर्थात ही गोष्ट घरी माहिती नसायची.

यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 65 टक्के आणि दहावीचा निकाल 71 टक्के लागलाय. आता एटीकेटीची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे अजून दोन पाच टक्क्यांना अकरावीत किंवा पदवीच्या पहिल्या वर्गाला प्रवेश मिळू शकेल. पण उरलेल्या विद्यार्थ्याचं काय… त्यांनी काय करायचं. नापासाचा किंवा रिपीटरचा शिक्का घेऊन आयुष्य काढायचं… आपल्याकडे दहावी-बारावीच्या परीक्षाचं स्तोम एवढं आहे की दहावी-बारावीत नापास झाला की आयुष्यातूनच नापास झाल्यासारखी बोलमी बसतात, अपमान होतो, अक्षरशः खचवलं जातं.

बरं हे विद्यार्थी नापास होतात, ते काही हौसेने नव्हे… कुणालाही नापास होण्याची, पराभूत होण्याची हौस नसते. तरीही आपल्याकडे नापासांच्या नावाने शंख केला जातो.

हे विद्यार्थी नापास होतात, यासाठी मी प्रामाणिकपणे शाळा आणि त्यातले शिक्षक यांनाच जबाबदार धरीन. यावर्षीही कोणत्यातरी पेपरमध्ये यावर्षी दहावीच्या निकालाची टक्केवारी का घसरली याचं कारण हेडलाईनमध्येच स्पष्ट करण्यात आलं होतं, दहावीचा निकाल कमी का लागला तर यावर्षी कॉपीवर निर्बंध आणण्यात आले म्हणून…!

म्हणजे दरवर्षी लाखो विद्यार्थी पास होतात ते काय कॉपी करूनच की काय…?

दहावी-बारावीच्या परीक्षेत दरवर्षी शाळा आणि त्यामध्ये शिकवणारे शिक्षकच नापास होतात, असं माझं प्रामाणिक मत आहे. आपण उगाचाच अपयशाचं खापर या विद्यार्थ्यांवर फोडतो, आणि त्यांना आयुष्यातून उठवतो. नापास तर शाळाच होतात. मुले नव्हे.

शिक्षकांच्या बाबतीत स्पष्टपणे बोलायचं तर आताशा म्हणजे सध्या शाळांशाळामधून शिकवत असलेल्या किती शिक्षकांनी आपल्या मेरीटवर नोकरी मिळवलीय, याविषयी मला शंका आहे. मेरीटवर म्हणण्याचा माझा अर्थ असा की आता तथाकथित अध्यापन कार्य करणाऱ्या जवळ जवळ प्रत्येक शिक्षकांनी आपल्या संस्थाचालकाला भरमसाठ पैसे दिलेले आहेत. याचा कागदोपत्री पुरावा कोठेच नसेल, भरमसाठ पैसे दिले नसतील तर किमान आठ-दहा वर्षे पे स्लीपवर दिसतो त्यापेक्षा कितीतरी कमी पगार घेऊन काम केलंय. म्हणूनच आताचे शिक्षक शाळांशाळांमधून शिकवत नाहीत तर शिकवण्याची नोकरी करतात. पूर्णपणे पोटार्थी असलेली शिक्षकांची जमात विद्यादान ते काय करणार… यावर शिक्षकांमधून तीव्र प्रतिक्रिया येतील… अपेक्षितच आहेत. त्यांनी आपण नोकरीला लागण्यासाठी दिलेल्या पैश्याचा आकडा किती होता. मी शाळेत असताना ही रक्कम दोन चार लाखात होती, आता तीच रक्कम अठरा ते वीस लाखांच्या दरम्यान झालीय. नोकरी मिळवण्यासाठी संस्थाचालकांना पैसे देण्यात शिक्षक मंडळींना काहीच गैर वाटत नाही. मग त्यांच्याकडून शिक्षणांची अपेक्षा कशी करायची. नोकरीला लागण्याची सुरूवातच अशी डळमळीत आणि पूर्णपणे पोटार्थी असेल तर तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दहावी-बारावी पास होण्याची अपेक्षा तरी कशी करायची.

शाळेचंही असंच आहे. शाळा नावाची वास्तू ज्याला आपण विद्येचं मंदिर अशा गोंडस नावांनीही ओळखतो, ते केव्हाच शिक्षणाचं दुकान झालंय. आणि त्याच्या गल्ल्यावर शिक्षणसम्राट बसलेत. अशा दुकाने बनलेल्या शाळांनी आजच्या पिढीच्या शिक्षणात का हस्तक्षेप करावा…

Published by मेघराज पाटील

A TV JOURNALIST, WORKING WITH STAR MAJHA A MARATHI NEWS CHANNEL

Leave a comment